मुंबई : राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करून ती १२ हजार ५०० रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली आहे.यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय उत्सव तसेच धार्मिक सणांच्या खर्चासाठी उत्सव अग्रिम दिला जातो. मात्र, सध्याची १२ हजार ५०० रुपयांची मर्यादा मागील काही वर्षांपासून वाढविण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिवाळी हा सर्वात मोठा सण असून या काळात कर्मचाऱ्यांचा खर्च वाढतो. महागाईच्या तुलनेत सध्याची उत्सव अग्रिम रक्कम अपुरी पडत असल्याने त्यात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे महासंघाने म्हटले आहे.शासनातील सुमारे ९० टक्के कर्मचारी दिवाळी उत्सवासाठी अग्रिम घेतात, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दिवाळीपूर्वी उत्सव अग्रिमाची मर्यादा २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
महासंघाने हे निवेदन माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडेही सादर केले आहे. आता शासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
